बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

शिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये लिहिलेले पहिले मूळ पत्र सापडले!

शिवापूरजवळील रांजे गावच्या पाटलांनी एका महिलेशी गैरवर्तन केले होते. न्यायनिवाडा करण्यामध्ये अतिशय परखड आणि स्पष्ट भूमिका घेणा-या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी स्त्रियांशी गैरवर्तन करणा-या गावाच्या पाटलाला थेट हातपाय तोडण्याची शिक्षा सुनावली होती... हा प्रसंग सविस्तर सांगणारे शिवाजी महाराजांचे सर्वांत जुने आणि अस्सल पत्र भारत इतिहास संशोधक मंडळाचे अभ्यासक अजित पटवर्धन आणि डॉ. अनुराधा कुलकर्णी यांना मिळाले आहे. पत्राच्या तारखेचे इसवी सनातील रूपांतर २८ जानेवारी १६४६ असे , असून त्यावर तत्कालीन मुद्रांनी शिक्कामोर्तबही करण्यात आले आहे.

हे पत्र पाहण्याची संधी जानेवारी महिन्यात इतिहासप्रेमींना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द , त्यांची न्यायनिवाडा करण्याची पद्धती यावर तज्ज्ञांकडून अखंड संशोधन सुरू असून इतिहासाची पाने उलगडताना अनेक नवनवीन दस्तऐवज पुढे येत आहेत. पटवर्धन आणि कुलकर्णी या अभ्यासकांना सापडलेले हे पत्र मुळात मंडळातील संशोधक स. ग. जोशी यांना ८३ वर्षांपू
र्वी म्हणजे १९२९ मध्ये मिळाले होते. पुढे १९३० साली मंडळाने शिवचरित्र-साहित्य खंड दोन या पुस्तकात ते प्रकाशित केले ; मात्र , त्यानंतर दीर्घ काळ या पत्राचा ठावठिकाणा ज्ञात नव्हता. मात्र या दोघांना मंडळाच्या दप्तरखान्यातच अभ्यास करताना नुकतेच हे पत्र मिळाले असून ते जुनारी कागदावर लिहिलेले आहे. पत्र अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील ७५ टक्के मजकूर वाचता येतो आहे , अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री. मा. भावे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराजांच्या पत्राचा मराठी अनुवाद
राजश्री शिवाजी राजे यांच्या कचेरीतून खेडेबारे तर्फेचे कारकून, देशमुख व देशकुलकर्णी यांना शुहूर सन १०४६
जाणावे की- सदर तर्फेतील रांजे या गावचा मोकदम बावाजी भिकाजी गुजर हा सदर गावाची मोकदमी करीत असताना त्याच्याकडून काही बदअमल झाला. ही गोष्ट साहेबांना (म्हणजे शिवाजी महाराजांना) विदीत झाली. त्यावरून साहेबांनी हुकूम करून त्याला पकडून आणविले तेव्हा चौकशी केल्यावर ती गोष्ट खरी असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर बावाजी याची वंशपरंपरा मोकदमी सरकारात जप्त केली आणि बावाजीचे हातपाय तोडून त्याला मोकदमीवरून काढून टाकले. त्या वेळी सोनजी बजाजी गुजर हे त्या गोतातील म्हणून त्यांनी विनंती केली की बावाजीस माझ्या हाती द्यावे. ती विनंती विचारात घेऊन बावाजीला तीनशे पादशाही होन दंड ठोठावला. ते सोनजी याने देऊन बावाजीस हाती घेतले. बावाजीस संतान नाही आणि सोनजी हा गुजर कुळातील आहे म्हणून साहेबांनी मेहेरबान होऊन सदर तर्फेतील रांजे गावची मोकदमी सोनजी बजाजी गुजर याच्या हवाली करून त्याच्याकडून सरकारात दोनशे पादशाही होन शुल्क घेऊन त्याला मोकदमी दिली आहे. त्याला कोणी अडथळा करू नये. हे मूळ पत्र भोगवटय़ाकरिता त्याला परत द्यावे. आक्षेप घेऊ नये. सुरनिसांनी रुजू केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा