शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

विवेकानंद आणि शिवाजी महाराज


विवेकानंद आणि शिवाजी महाराज
100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मद्रासच्या (आत्ताचे चेन्नई) समुद्रकिना?र्‍यावरील एका घराच्या गच्चीवर रात्रीच्या नीरव शांततेत चांदण्या रात्री एका युवा संन्याशाच्या गीताचे स्वर घुमताहेत..

'जैसे अरण्यास दावानल, हरीण कळपास चित्ता

भव्य गजास वनराज, घोर तमास सूर्य अन्

कंसास र्शीकृष्ण असे, तैसे म्लेंच्छांच्या रानटी

टोळ्यांस राजा शिवछत्रपती !'

'स्वामीजी, काय हे? आपण मुक्तकंठाने स्तुतिसुमने उधळीत आहात.' स्वामीजी काही बोलणार त्याआधीच तो शिष्य स्वामीजींना विचारू लागला, 'स्वामीजी, आपल्यासारखी आध्यात्मिक व्यक्ती हिंसाचार करणार्‍याची स्तुती करू शकते? की ज्याने जमावाच्या मनात प्रक्षोभ निर्माण करून लुटालूट आणि सर्व प्रकारच्या अत्याचाराचे नेतृत्व केले.'
स्वामीजी तत्काळ थांबले, तीव्र संतापाने त्यांच्या चेहरा लालबुंद झाला. ते गरजले, 'मला तुम्हा लोकांची लाज वाटते! भारतवर्षाच्या एका महापुरुषाबद्दल, धर्मात्म्याबद्दल असे अशोभनीय शब्द तुमच्या ओठावर येतातच कसे?

जेव्हा आपला धर्म आणि संस्कृती विनाशाच्या उंबरठय़ावर जाऊन पोहोचली होती, जेव्हा संपूर्ण समाजाचे घोर अध:पतन होऊन मातृभूमीच्या गौरवाची मानखंडना होत होती, अशा वेळी समाजाला वाचवण्याचे, मातृभूमीला गौरव प्रदान करण्याचे कार्य ज्या वीर पुरुषाने केले; त्याच्याविरुद्ध असे खुळचट आणि वृथा आरोप करण्याचे धाडस कसे करता? ज्यांना भारताबद्दल काही देणे-घेणे नव्हते, ज्यांना भारतीय संस्कृती व परंपरा याबद्दल आस्था नव्हती आणि भारताला गुलामीत ठेवणे हेच ज्यांचे ध्येय होते अशा धूर्त, कावेबाज परकीयांनी लिहिलेला इतिहास वाचल्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही लोक तो विकृत इतिहास घोकून बरळत आहात.'

'सत्य तर हे आहे की भारतातील सारे जन, ऋषी-मुनी परकीयांच्या जोखडातून, दास्यातून मुक्ती मिळवून देणा?र्‍या महापुरुषांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होते. अशा मोक्याच्या वेळी छत्रपती शिवरायांनी परकीय दास्यातून मुक्त करून धर्माची पुनर्संस्थापना केली. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होते. भविष्यातील उज्‍जवल भारताच्या भवितव्याची मशाल पेटविणारा असा हा राजा..' स्वामीजी भारावून सांगतच होते. स्वामीजींचा शिष्य स्वत:च्या अज्ञानाने लज्जित झाला होता. तो स्वामीजींना अत्यंत क्षीण आवाजात विनंती करू लागला, 'स्वामीजी! कृपया आमच्या गैरसमजुती दूर करून मार्गदर्शन करा.'
मध्यरात्री उशिरापर्यंत स्वामीजी आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपतींचा तेजस्वी इतिहास सांगत होते.तो युवा संन्यासी म्हणजे मातृभूमीचे उत्कट भक्त, निष्ठेचे सुधारणावादी आणि सातासमुद्रापार जाऊन विदेशांमध्ये भारतीय संस्कृतीची विजयपताका फडकविणारा योद्धा तसेच आत्मविस्मृत भारतीयांची अस्मिता जागविणारे स्वामी विवेकानंद होत. ही घटना आहे र्शी भट्टाचार्यंजींच्या घरातली आणि तो शिष्य म्हणजे डॉ. एम. सी. नंजुंद्र राव होत. त्यांनी नंतर त्यावेळच्या 'वेदांत केसरी'त ही घटना लिहिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा