मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

अ‍ॅनिमेटेड प्रभो शिवाजी राजा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं विलक्षण कर्तृत्व अ‍ॅनिमेटेड चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर येतंय. इन्फिनिटी व्हिज्युअल्स व मेफॅक यांनी ‘प्रभो शिवाजी राजा’ या शंभर मिनिटांच्या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हा अ‍ॅनिमेटेड चित्रपट वास्तव वाटावं यासाठी गेल्या दोन वर्षापासून या टीमने अपार कष्ट घेतलेत. सचिन खेडेकर यांच्या ओघवत्या शैलीतल्या निवेदनातून हा चित्रपट उलगडत जाणार असून यात महाराजांच्या जीवनातले अनेक महत्त्वाचे टप्पे दाखवण्यात आले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली निनाद बेडेकर यांनी या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली आहे.या चित्रपटाचं वैशिष्टय म्हणजे, डच चित्रकाराने त्या काळात काढलेल्या महाराजांच्या मूळ चित्राबरहुकूम महाराजांची अ‍ॅनिमेटेड व्यक्तिरेखा तयार करण्यात आलीय. चित्र व रेखाचित्र यांच्या परंपरागत अ‍ॅनिमेशनचा व संगणकीय अ‍ॅनिमेशन तंत्राचा सुरेख संगम या चित्रपटात पाहायला मिळेल, असा विश्वास या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश मुळे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या चमूने तब्बल दोन वर्ष सतत मेहनत करून या चित्रपटाचं अनिमेशन अंतिम स्वरूप दिलंय. या चित्रपटासाठी यातल्या ३० महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची तब्बल पावणेतीन लाख चित्रं काढण्यात आली होती. तसंच नऊ हजारांहून अधिक पार्श्वभूमींचा वापर करण्यात आलाय. पडद्यावर काही सेकंद दिसणारी फ्रेमही परीपूर्ण असावी, असा प्रयत्न या चित्रपटासाठी करण्यात आलाय. भरत बलवली यांनी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीताची बाजू सांभाळली असून कवी भूषण यांच्या कवितांचाही समावेश करण्यात आला आहे. हा चित्रपट केवळ लहान मुलांनाच नव्हे तर मोठयांनाही आनंद व प्रेरणा देऊन जाईल, असा विश्वास या चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केलाय.

गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

बिहारच्या तरुणाईचे आयकॉन मराठमोळे अधीक्षक शिवदीप लांडेपोलिस अधीक्षक शिवदीप लांडे  
 
बिहार पोलिस दलात कार्यरत एका मराठमोळ्या तरुणाने सध्या केवळ बिहार सरकारचे नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे हे बिहारच्या तरुणाईचे आयकॉन ठरले आहेत. एकीकडे प्रांतवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिहारमध्ये मराठी अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी म्हणून स्थानिक रस्त्यावर येतात. आंदोलनाची भूमिका घेतात ही शिवदीप लांडे यांच्या कर्तव्यदक्षतेची पावती आहे... 
बिहारमध्ये एका कर्तव्यकठोर मराठी पोलिस अधिकाऱ्याने शिस्तीचा बडगा उभारावा आणि त्याला जनतेची साथ मिळावी ... इतकी की त्यांची बदली झाल्यावर ती रद्द करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरावेत, हे एकूणच अजब आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे यांनी ही किमया करून दाखविली. 
शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस या गावचे. २० मे १९७६ रोजी जन्मलेल्या शिवदीप यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात झाले. वडील वामन लांडे हे शेतकरी. कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली नव्हती. शेगावच्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. ही पदवी संपादन केली. वेगळे कर्तृत्व दाखवायचे, असा त्यांचा आधीपासून ध्यास होता. आयुष्यात ' जरा हटके ' करण्याची इच्छा होती. त्यानुसार, पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सेल्फस्टडी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी यूपीएससीमध्ये उज्ज्वल यश मिळविले. आयपीएससाठी रँकिंग मिळविले. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची बिहार केडरमध्ये नियुक्ती झाली.  त्यांचे पहिले पोस्टिंग माओवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात झाले. माओवादाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी व्यापक मोहीम राबविली. लांडे यांच्या या धडाकेबाज कामामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नितीशकुमारांच्या अजेंड्यावरच होता. याच धोरणातून लांडे यांना त्यांनी राजधानी पाटणा येथे आणले. पाटण्याला पोस्टिंग मिळताच लांडे यांनी माफियाराज, अपहरण, खून, छेडखानी करणा‌ऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. दहा महिन्यांत त्यांनी तेथील अनेक टोळ्यांचा बंदोबस्त केला. वाहतूक शाखेचे एसपी म्हणूनही त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. त्यामुळे वाहतुकीची शिस्त काय असते? हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. अन्यायाविरुद्ध रोखठोक भूमिका घ्यायची आणि सामान्य नागरिकांना निर्धास्त करायचे असा जणू वसा त्यांनी घेतला. सुरुवातीला काहींना ही स्टंटबाजी वाटली. पण लांडे यांना स्वत:वर विश्वास होता. काही दिवसांत स्थानिकांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. हा विश्वास दृढ झाला आणि प्रचंड शिस्त व आक्रमक कार्यपद्धतीमुळे एखादा चित्रपटातील नायक जसा लोकप्रिय ठरतो, तसे शिवदीप लोकप्रिय ठरले. त्यांची ही लोकप्रियता तरुणांमध्ये अधिक आहे. इतकी की दररोज त्यांना ' ला‌इक ' करणारे सुमारे ३०० मेसेज मिळतात. त्यांची पाटण्याहून बदली झाली. ही बदली रद्द करा म्हणून बिहारी नागरिक रस्त्यावर आले. खुद्द मुख्यमंत्र्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. कर्तव्य पार पाडताना लांडे सामाजिक बांधिलकीही जपतात. वेतनातील ७० टक्के रक्कम गरीब मुलींचे विवाह करून देणाऱ्या संस्थेला ते नियमित देतात. परप्रांतातून महाराष्ट्र कॅडरमध्ये आलेले अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी प्रभावित जिल्ह्यांमध्ये काम करण्यास इच्छुक नसतात. त्यांच्यासाठी लांडे यांच्यासारखे अधिकारी आदर्श ठरावे.

                    मराठह्यांड तफ़्रे लांडे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

सचिनला त्रिवार अभिवादन

आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी... 
सचिन आता राज्यसभेत खासदार आहे. या नव्या भूमिकेतील योजनांविषयी सचिन म्हणतो, "खासदार निधीचे पैसे योग्य कामी कसे वापरायचे, याचा विचार माझ्या मनात घोळत असतो. येत्या काही दिवसांत मी विदर्भातील शेतकऱ्यांसाठीही काम करणार आहे. तसेच, ज्या गावात वीज नाही, तिथे हे "सोलर लॅंप' देणार आहे. पण हे काम माझ्या एकट्याने होणाऱ्यातले नाही. मला तुमच्या सर्वांच्या सक्रिय सहभागाची, मदतीची नितांत गरज आहे. लवकरच आम्ही या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करून लोकांना या चांगल्या कामात सहभागी कसे होता येईल, याचा आराखडा जाहीर करणार आहोत.'' 
वेळ मिळाला, की मी वेळुंजे गावात जाणार आहे. तिथल्या ग्रामस्थांना मला भेटायचे आहे. इतकेच नाही, तर एका रात्रीचे जेवणही त्यांच्याबरोबर करायचे आहे. हे माझे कोरडे आश्‍वासन नाही. 
                                                                                                                            - सचिन तेंडुलकर 

गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

अमेरिकन नौदलाच्या संशोधनात मराठी झेंडा

अमेरिकन नौदलाचे जास्त क्षमतेची स्फोटके बनविण्यासाठी संशोधन सुरू आहे. एक प्रबळ देश म्हणून अमेरिकेच्या या संशोधनाचा भविष्यात आपल्यालाही फायदा होईल, ही एक जमेची बाजू असली तरी सांगण्याचा मुख्य मुद्दा असा की, या संशोधनात सिद्धार्थ पंडितराव या मराठी तरूणाचा अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. सिद्धार्थने आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर या जागतिक पातळीवरील संशोधनात एक शोधनिबंध मांडला. कमी वयातील सिद्धार्थच्या संशोधनपूर्ण यशाची ही कहाणी.. त्याच्यासारख्या अनेक तरुणांना प्रेरणादायी अशीच!                                                                                                                      

श्रीनिवास रामानुजन यांचं ‘अंकशास्त्रा’तलं संशोधन, सर जे जे थॉमसन यांचा अणुमधल्या ‘इलेक्ट्रॉन’चा शोध, सर आयझॉक न्युटन यांचा ‘गुरूत्त्वाकर्षणाचा सिद्धांत’ तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं भारताच्या ‘क्षेपणास्त्र योजनेत’लं बहुमुल्य योगदान; असे संदर्भ वाचले की या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांविषयी आपल्या मनात लगेचच आदराची भावना निर्माण होते. पण ‘संशोधन करायचं’ म्हटलं की ‘ये तो अपने बस की बात नहीं’ असा विचार आपसुकच अनेकांच्या मनात पक्का होतो. 

असं असलं तरी, आपल्या आजुबाजूलाच काही ‘संशोधक’ दडलेले असतात. विलेपार्ले येथे राहणारा सिद्धार्थ पंडितराव हा त्यापैकी एक. ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागा’तून २००८ साली विशेष प्राविण्य मिळवून सिद्धार्थने केमिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. पण त्याच्या हुशारीमुळे डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेआधीच त्याचा अमेरिकेतील विद्यापीठातला प्रवेश पक्का झाला होता. त्याची अभिरूची असलेला विषय ‘टेक्सास टेक युनिव्हर्सिटी’मध्ये शिकवला जात असल्याने त्याने ‘केमिकल इंजिनीअरिंग’ या विषयात ‘बी. एस्.’ ही पदवी मिळवण्यासाठी इथे प्रवेश घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सिद्धार्थ दरवर्षी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करत आला आहे. इतकंच नव्हे, तर टेक्सास विद्यापीठाची शिष्यवृत्तीसुद्धा त्याने मिळवली. यावर्षी तो मे महिन्यात केमिकल इंजिनीअरिंग हा विषय घेऊन ‘बी एस्’ होईल तर केमिस्ट्री ‘मॅथ्स ऍण्ड मॅनेजमेंट’ हा त्याचा उपविषय आहे.

सध्या सिद्धार्थ प्रा. ब्रँडन वीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नौदलातील स्फोटके’ बनविण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकन नौदलाच्या संशोधकांच्या चमूमध्ये काम करत आहे. या संशोधनासाठी प्रा. वीक यांच्या प्रयोगशाळेला अमेरिकन नौदलाने सुमारे दोन मिलियन डॉलर एवढी रक्कम देऊ केली आहे. प्रा. वीक यांच्या ‘संशोधक टीम’चा या स्फोटके विषयावरील शोधनिबंध ‘अमेरिकन इन्स्टिटयुट ऑफ फिजिक्स’च्या ‘अप्लाइड फिजिक्स लेटर्स’ मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांच्या या संशोधनकार्याला ‘ओरिजिनल रिसर्च’ म्हणून मान्यताही मिळाली आहे. विशेष म्हणजे, या शोधनिबंधातील ‘ग्राफिन ऑक्साइडचा क्ष-किरण प्रज्वलनातील सक्रिय उर्जेवर आणि नायट्रोसेल्युलोज फितीच्या औष्णिक स्थिरतेवर काय परिणाम होतो’, या विषयावरच्या संशोधनात सिद्धार्थचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अधिकाधिक जास्त क्षमतेची स्फोटके बनवण्यासाठी हे संशोधन सुरू असून इतक्या कमी वयात आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर यशस्वीरीत्या करिअरची वेगळी वाट चोखंदळणारा सिद्धार्थ पंडितराव अनेक तरूणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल. 

शोधनिबंधात सिद्धार्थने काय मांडलं?

नायट्रोसेल्युलोजच्या मायक्रो-फिल्मस् जेव्हा ग्राफिन ऑक्साइडमध्ये बुडविल्या जातात तेव्हा नायट्रोसेल्युलोजची ज्वलन क्षमता आणि क्ष-किरणांचे प्रज्वलन या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या नियंत्रणात कशा ठेवता येतील, आणि जास्तीत जास्त क्षमतेची स्फोटके कशी निर्माण करता येतील, यासाठी हे संशोधन मांडले गेले आहे. ही प्रक्रिया कमी तापमानाला घडवून आणण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. ग्राफिन ऑक्साइड क्ष-किरण प्रज्वलनातील सक्रिय ऊर्जेवर आणि नायट्रोसेल्युलोजच्या औष्णिक स्थिरतेवर(थर्मल स्टेबिलिटी) काय परिणाम करतात, याचा अभ्यास केला गेला. त्यातून असं दिसून आलं की, ग्राफिन ऑक्साइड आणि नायट्रोसेल्युलोज यांच्या वजनाचं गुणोत्तर वाढलं की, क्ष-किरणांच्या प्रज्वलनातून बाहेर पडणारी सक्रिय ऊर्जा कमी होते आणि अति संकेंद्रण स्थितीत(हायर कॉन्सन्ट्रेशन) स्थिरांक गाठता येतो. स्फोटकांमध्ये औष्णिक स्थिरता आणण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

मराठमोळ्या राहीचा वर्ल्डकपमध्ये ‘सुवर्ण’भेद

महाराष्ट्रातील मराठमोळी सुकन्या राही सरनोबत हिनं कोरियामध्ये सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २५ मीटर पिस्तुल प्रकारात राहीनं हा पराक्रम रचला आणि भारताचा तिरंगा डौलानं फडकवला.

नेमबाजी वर्ल्ड कपमधील २५ मीटर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम क्याँगेचं कडवं आव्हान राही सरनोबतपुढे होतं. परंतु, जराही न डगमगता, अत्यंत संयमानं, शांत डोक्यानं राहीनं आपली पिस्तुल 'चालवली' आणि ८-६ अशी बाजी मारली. आजवर एकाही भारतीय नेमबाजाला जी किमया साधता आली नव्हती, ज्या सुवर्णपदकाचं स्वप्न अनेकांनी पाहिलं होतं, ते कोल्हापूरच्या पोरीनं प्रत्यक्षात साकारलं. २३ वर्षीय राहीसाठी आजचा दिवस खरोखरच 'सोनियाचा दिनु' ठरला.

२०११मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड कप स्पर्धेत राहीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. त्या कामगिरीच्या जोरावर तिला लंडन ऑलिंपिकचं तिकीट मिळालं खरं, पण तरीही सुवर्णपदक हुकल्याची खंत तिच्या मनात कुठेतरी होतीच. दोन वर्षांपूर्वी झालेली चूक यावेळी करायची नाही, हे पक्कं ठरवूनच राही यंदा कोरियाला गेली आणि जिगरबाज खेळ करत तिनं 'सुवर्णलक्ष्य' भेदलं.

स्वप्न साकार झालं!
वर्ल्ड कपचं सुवर्णपदक जिंकायचं माझं स्वप्न आज साकार झालंय. हा आनंद केवळ अवर्णनीय आहे, अशी भावना राहीनं विजयानंतर व्यक्त केली. माझे प्रशिक्षक अनाटोली पुद्दुबनी यांच्यासह मी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती, त्याचं चीज झालं आहे. 'लक्ष्य' आणि 'व्हस्कॉन' यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली, असंही तिनं आवर्जून नमूद केलं.

सोमवार, १ एप्रिल, २०१३

बीपीनंतर टीपीबीपी सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर रवी आपला सगळा वेळ घालवतोय तो केवळ टाइमपास करण्यात. आता फक्त टीपी करायचा इतकंच त्याच्या डोक्यात आहे. अहं.. अॅक्चुअली टाइमपास नव्हे. तर बीपी नंतरच्या त्याच्या पुढच्या सिनेमाचं नाव टीपी अर्थात टाइमपास आहे. 
................... 

दिग्दर्शक रवी जाधवने दिलेल्या तीन सिनेमांतून आपला असा प्रेक्षकवर्ग बनवला आहे. ' नटरंग ', ' बालगंधर्व ' आणि ' बीपी तथा बालक-पालक ' असे हिट सिनेमे देऊन त्याने ते सिद्ध केलं. त्यातही सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवलं ' बीपी ' ने. अशा सुपरहिट सिनेमानंतर रवीचं पुढचं पाऊल कोणतं असेल यावर सोशल साइट्सवर चर्चा झडू लागल्यात. त्याने काय विषय हाताळावेत याचे सल्लेही त्याला दिले जातायत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर अखेर रवीने आपल्या चौथ्या सिनेमाचा विषय निश्चित केला आहे. त्याचं नाव आहे टीपी अर्थात टाइमपास. यातून तो म्युझिकल लव्हस्टोरी हाताळणार आहे. 

टीपी ची कथा रवीचीच असून निर्माताही तोच असणार आहे. बीपी प्रमाणे या सिनेमाची पटकथा संवाद हे अंबर हडप गणेश पंडित आणि रवी या तिघांचे असतील. टीपी च्या दोन गाण्याचं रेकॉर्डिंगही झालं असून ,चिनार-महेश यांनी त्याचं संगीत दिलंय. या नव्या सिनेमाबद्दल बोलताना रवी म्हणाला , ' माझे तीनही सिनेमे वेगळे होते. त्याचे विषय कठीण होते. पण चौथा सिनेमा मात्र मला खूप सोपा हलका-फुलका करायचा होता. तेच कठीण काम आहे. बीपी चं शूट सुरू असतानाच मला टाइमपास ची कथा सुचली होती. टीपी ही लव्हस्टोरी आहे. थोडक्यात सांगायचं तर शाळा संपल्यानंतर आणि कॉलेज सुरू झाल्यावर साधारणपणे आयुष्यात पहिल्या प्रेमाचा अनुभव येतो. या प्रेमाकडे टाइमपास म्हणून पाहिलं जातं. पण त्यातूनच आपल्याला खरं प्रेम कळायला लागतं. अशा १६ ते १८ वयोगटातल्या मुलांची ही प्रेमकथा आहे. या सिनेमासाठी रवीने निवडलीय तीशाळा मधली केतकी माटेगावकर आणि बीपी त विशू झालेला प्रथमेश परब. 

'' बीपी प्रमाणे माझ्या या सिनेमाचा काळाही १९८८ ते ९० असाच असेल कारण त्या प्रेमाच्या अनुभवातून मी गेलो आहे. तो अनुभव मला पडद्यावर मांडायचाय. अर्थात तो आजच्या काळातल्या मुलांनाही येतोच. पण काळ थोडा जुना घेतला की त्यावेळच्या व्हॅल्यूज दाखवता येतात. त्यातून प्रेक्षक नॉस्टॅल्जिक होईल. जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक लव्हस्टोरीमध्ये एक राजकन्या असते आणि एक गुलाम. अगदी चाळीतही अशीच स्थिती असते. माझी गोष्टही अशाच राजकन्या-गुलामाची आहे. राजकन्येचं नाव आहे प्राजक्ता आणि गुलामाचं नाव दगडू. दोघांचे आर्थिक स्तर वेगळे जीवनशैली वेगळी स्वभाव टोकाचे.. अशा दोघांची ही लव्हेबल गोष्ट असेल ,'असंही रवीने सांगितलं. 

इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमातही दिग्दर्शकाचं आपलं असं स्टेटमेंट असेल. रवीचा हाच ' टाइमपास ' सध्या जोरावर असून , येत्या मे महिन्यात याच शूटही मुंबई-ठाण्यात होणार आहे.