अमेरिकन नौदलाच्या संशोधनात मराठी झेंडा
अमेरिकन नौदलाचे जास्त क्षमतेची स्फोटके बनविण्यासाठी संशोधन सुरू आहे. एक प्रबळ देश म्हणून अमेरिकेच्या या संशोधनाचा भविष्यात आपल्यालाही फायदा होईल, ही एक जमेची बाजू असली तरी सांगण्याचा मुख्य मुद्दा असा की, या संशोधनात सिद्धार्थ पंडितराव या मराठी तरूणाचा अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. सिद्धार्थने आपल्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर या जागतिक पातळीवरील संशोधनात एक शोधनिबंध मांडला. कमी वयातील सिद्धार्थच्या संशोधनपूर्ण यशाची ही कहाणी.. त्याच्यासारख्या अनेक तरुणांना प्रेरणादायी अशीच!
श्रीनिवास रामानुजन यांचं ‘अंकशास्त्रा’तलं संशोधन, सर जे जे थॉमसन यांचा अणुमधल्या ‘इलेक्ट्रॉन’चा शोध, सर आयझॉक न्युटन यांचा ‘गुरूत्त्वाकर्षणाचा सिद्धांत’ तर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं भारताच्या ‘क्षेपणास्त्र योजनेत’लं बहुमुल्य योगदान; असे संदर्भ वाचले की या बुद्धिमान व्यक्तिमत्त्वांविषयी आपल्या मनात लगेचच आदराची भावना निर्माण होते. पण ‘संशोधन करायचं’ म्हटलं की ‘ये तो अपने बस की बात नहीं’ असा विचार आपसुकच अनेकांच्या मनात पक्का होतो.
असं असलं तरी, आपल्या आजुबाजूलाच काही ‘संशोधक’ दडलेले असतात. विलेपार्ले येथे राहणारा सिद्धार्थ पंडितराव हा त्यापैकी एक. ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागा’तून २००८ साली विशेष प्राविण्य मिळवून सिद्धार्थने केमिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. पण त्याच्या हुशारीमुळे डिप्लोमाच्या अंतिम परीक्षेआधीच त्याचा अमेरिकेतील विद्यापीठातला प्रवेश पक्का झाला होता. त्याची अभिरूची असलेला विषय ‘टेक्सास टेक युनिव्हर्सिटी’मध्ये शिकवला जात असल्याने त्याने ‘केमिकल इंजिनीअरिंग’ या विषयात ‘बी. एस्.’ ही पदवी मिळवण्यासाठी इथे प्रवेश घेतला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सिद्धार्थ दरवर्षी गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त करत आला आहे. इतकंच नव्हे, तर टेक्सास विद्यापीठाची शिष्यवृत्तीसुद्धा त्याने मिळवली. यावर्षी तो मे महिन्यात केमिकल इंजिनीअरिंग हा विषय घेऊन ‘बी एस्’ होईल तर केमिस्ट्री ‘मॅथ्स ऍण्ड मॅनेजमेंट’ हा त्याचा उपविषय आहे.
सध्या सिद्धार्थ प्रा. ब्रँडन वीक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नौदलातील स्फोटके’ बनविण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकन नौदलाच्या संशोधकांच्या चमूमध्ये काम करत आहे. या संशोधनासाठी प्रा. वीक यांच्या प्रयोगशाळेला अमेरिकन नौदलाने सुमारे दोन मिलियन डॉलर एवढी रक्कम देऊ केली आहे. प्रा. वीक यांच्या ‘संशोधक टीम’चा या स्फोटके विषयावरील शोधनिबंध ‘अमेरिकन इन्स्टिटयुट ऑफ फिजिक्स’च्या ‘अप्लाइड फिजिक्स लेटर्स’ मध्ये प्रकाशित झाला आहे. त्यांच्या या संशोधनकार्याला ‘ओरिजिनल रिसर्च’ म्हणून मान्यताही मिळाली आहे. विशेष म्हणजे, या शोधनिबंधातील ‘ग्राफिन ऑक्साइडचा क्ष-किरण प्रज्वलनातील सक्रिय उर्जेवर आणि नायट्रोसेल्युलोज फितीच्या औष्णिक स्थिरतेवर काय परिणाम होतो’, या विषयावरच्या संशोधनात सिद्धार्थचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अधिकाधिक जास्त क्षमतेची स्फोटके बनवण्यासाठी हे संशोधन सुरू असून इतक्या कमी वयात आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर यशस्वीरीत्या करिअरची वेगळी वाट चोखंदळणारा सिद्धार्थ पंडितराव अनेक तरूणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरू शकेल.
शोधनिबंधात सिद्धार्थने काय मांडलं?
नायट्रोसेल्युलोजच्या मायक्रो-फिल्मस् जेव्हा ग्राफिन ऑक्साइडमध्ये बुडविल्या जातात तेव्हा नायट्रोसेल्युलोजची ज्वलन क्षमता आणि क्ष-किरणांचे प्रज्वलन या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या नियंत्रणात कशा ठेवता येतील, आणि जास्तीत जास्त क्षमतेची स्फोटके कशी निर्माण करता येतील, यासाठी हे संशोधन मांडले गेले आहे. ही प्रक्रिया कमी तापमानाला घडवून आणण्यासाठी क्ष-किरणांचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. ग्राफिन ऑक्साइड क्ष-किरण प्रज्वलनातील सक्रिय ऊर्जेवर आणि नायट्रोसेल्युलोजच्या औष्णिक स्थिरतेवर(थर्मल स्टेबिलिटी) काय परिणाम करतात, याचा अभ्यास केला गेला. त्यातून असं दिसून आलं की, ग्राफिन ऑक्साइड आणि नायट्रोसेल्युलोज यांच्या वजनाचं गुणोत्तर वाढलं की, क्ष-किरणांच्या प्रज्वलनातून बाहेर पडणारी सक्रिय ऊर्जा कमी होते आणि अति संकेंद्रण स्थितीत(हायर कॉन्सन्ट्रेशन) स्थिरांक गाठता येतो. स्फोटकांमध्ये औष्णिक स्थिरता आणण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा