' बीपी ' सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर रवी आपला सगळा वेळ घालवतोय तो केवळ टाइमपास करण्यात. आता फक्त ' टीपी ' करायचा इतकंच त्याच्या डोक्यात आहे. अहं.. अॅक्चुअली टाइमपास नव्हे. तर ' बीपी ' नंतरच्या त्याच्या पुढच्या सिनेमाचं नाव ' टीपी ' अर्थात टाइमपास आहे.
...................
दिग्दर्शक रवी जाधवने दिलेल्या तीन सिनेमांतून आपला असा प्रेक्षकवर्ग बनवला आहे. ' नटरंग ', ' बालगंधर्व ' आणि ' बीपी तथा बालक-पालक ' असे हिट सिनेमे देऊन त्याने ते सिद्ध केलं. त्यातही सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवलं ' बीपी ' ने. अशा सुपरहिट सिनेमानंतर रवीचं पुढचं पाऊल कोणतं असेल यावर सोशल साइट्सवर चर्चा झडू लागल्यात. त्याने काय विषय हाताळावेत याचे सल्लेही त्याला दिले जातायत. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर अखेर रवीने आपल्या चौथ्या सिनेमाचा विषय निश्चित केला आहे. त्याचं नाव आहे टीपी अर्थात टाइमपास. यातून तो म्युझिकल लव्हस्टोरी हाताळणार आहे.
' टीपी ' ची कथा रवीचीच असून , निर्माताही तोच असणार आहे. ' बीपी ' प्रमाणे या सिनेमाची पटकथा , संवाद हे अंबर हडप , गणेश पंडित आणि रवी या तिघांचे असतील. ' टीपी ' च्या दोन गाण्याचं रेकॉर्डिंगही झालं असून ,चिनार-महेश यांनी त्याचं संगीत दिलंय. या नव्या सिनेमाबद्दल बोलताना रवी म्हणाला , ' माझे तीनही सिनेमे वेगळे होते. त्याचे विषय कठीण होते. पण , चौथा सिनेमा मात्र मला खूप सोपा , हलका-फुलका करायचा होता. तेच कठीण काम आहे. ' बीपी ' चं शूट सुरू असतानाच मला ' टाइमपास ' ची कथा सुचली होती. ' टीपी ' ही लव्हस्टोरी आहे. थोडक्यात सांगायचं तर शाळा संपल्यानंतर आणि कॉलेज सुरू झाल्यावर साधारणपणे आयुष्यात पहिल्या प्रेमाचा अनुभव येतो. या प्रेमाकडे ' टाइमपास ' म्हणून पाहिलं जातं. पण , त्यातूनच आपल्याला खरं प्रेम कळायला लागतं. अशा १६ ते १८ वयोगटातल्या मुलांची ही प्रेमकथा आहे. ' या सिनेमासाठी रवीने निवडलीय ती' शाळा ' मधली केतकी माटेगावकर आणि ' बीपी ' त विशू झालेला प्रथमेश परब.
'' बीपी ' प्रमाणे माझ्या या सिनेमाचा काळाही १९८८ ते ९० असाच असेल कारण , त्या प्रेमाच्या अनुभवातून मी गेलो आहे. तो अनुभव मला पडद्यावर मांडायचाय. अर्थात तो आजच्या काळातल्या मुलांनाही येतोच. पण , काळ थोडा जुना घेतला की त्यावेळच्या व्हॅल्यूज दाखवता येतात. त्यातून प्रेक्षक नॉस्टॅल्जिक होईल. जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की प्रत्येक लव्हस्टोरीमध्ये एक राजकन्या असते आणि एक गुलाम. अगदी चाळीतही अशीच स्थिती असते. माझी गोष्टही अशाच राजकन्या-गुलामाची आहे. राजकन्येचं नाव आहे प्राजक्ता आणि गुलामाचं नाव दगडू. दोघांचे आर्थिक स्तर वेगळे , जीवनशैली वेगळी , स्वभाव टोकाचे.. अशा दोघांची ही लव्हेबल गोष्ट असेल ,'असंही रवीने सांगितलं.
इतर सिनेमांप्रमाणे या सिनेमातही दिग्दर्शकाचं आपलं असं स्टेटमेंट असेल. रवीचा हाच ' टाइमपास ' सध्या जोरावर असून , येत्या मे महिन्यात याच शूटही मुंबई-ठाण्यात होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा