गुरुवार, २५ एप्रिल, २०१३

बिहारच्या तरुणाईचे आयकॉन मराठमोळे अधीक्षक शिवदीप लांडे



पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे  
 
बिहार पोलिस दलात कार्यरत एका मराठमोळ्या तरुणाने सध्या केवळ बिहार सरकारचे नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे हे बिहारच्या तरुणाईचे आयकॉन ठरले आहेत. एकीकडे प्रांतवादावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिहारमध्ये मराठी अधिकाऱ्याची बदली रद्द व्हावी म्हणून स्थानिक रस्त्यावर येतात. आंदोलनाची भूमिका घेतात ही शिवदीप लांडे यांच्या कर्तव्यदक्षतेची पावती आहे... 
बिहारमध्ये एका कर्तव्यकठोर मराठी पोलिस अधिकाऱ्याने शिस्तीचा बडगा उभारावा आणि त्याला जनतेची साथ मिळावी ... इतकी की त्यांची बदली झाल्यावर ती रद्द करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरावेत, हे एकूणच अजब आहे. बिहार पोलिस दलातील पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे यांनी ही किमया करून दाखविली. 
शिवदीप लांडे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस या गावचे. २० मे १९७६ रोजी जन्मलेल्या शिवदीप यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात झाले. वडील वामन लांडे हे शेतकरी. कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली नव्हती. शेगावच्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी बी. ई. ही पदवी संपादन केली. वेगळे कर्तृत्व दाखवायचे, असा त्यांचा आधीपासून ध्यास होता. आयुष्यात ' जरा हटके ' करण्याची इच्छा होती. त्यानुसार, पदवी शिक्षण घेत असतानाच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सेल्फस्टडी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी यूपीएससीमध्ये उज्ज्वल यश मिळविले. आयपीएससाठी रँकिंग मिळविले. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची बिहार केडरमध्ये नियुक्ती झाली.  त्यांचे पहिले पोस्टिंग माओवादाचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात झाले. माओवादाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी व्यापक मोहीम राबविली. लांडे यांच्या या धडाकेबाज कामामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नितीशकुमारांच्या अजेंड्यावरच होता. याच धोरणातून लांडे यांना त्यांनी राजधानी पाटणा येथे आणले. पाटण्याला पोस्टिंग मिळताच लांडे यांनी माफियाराज, अपहरण, खून, छेडखानी करणा‌ऱ्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली. दहा महिन्यांत त्यांनी तेथील अनेक टोळ्यांचा बंदोबस्त केला. वाहतूक शाखेचे एसपी म्हणूनही त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी होती. त्यामुळे वाहतुकीची शिस्त काय असते? हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. अन्यायाविरुद्ध रोखठोक भूमिका घ्यायची आणि सामान्य नागरिकांना निर्धास्त करायचे असा जणू वसा त्यांनी घेतला. सुरुवातीला काहींना ही स्टंटबाजी वाटली. पण लांडे यांना स्वत:वर विश्वास होता. काही दिवसांत स्थानिकांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटू लागला. हा विश्वास दृढ झाला आणि प्रचंड शिस्त व आक्रमक कार्यपद्धतीमुळे एखादा चित्रपटातील नायक जसा लोकप्रिय ठरतो, तसे शिवदीप लोकप्रिय ठरले. त्यांची ही लोकप्रियता तरुणांमध्ये अधिक आहे. इतकी की दररोज त्यांना ' ला‌इक ' करणारे सुमारे ३०० मेसेज मिळतात. त्यांची पाटण्याहून बदली झाली. ही बदली रद्द करा म्हणून बिहारी नागरिक रस्त्यावर आले. खुद्द मुख्यमंत्र्यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. कर्तव्य पार पाडताना लांडे सामाजिक बांधिलकीही जपतात. वेतनातील ७० टक्के रक्कम गरीब मुलींचे विवाह करून देणाऱ्या संस्थेला ते नियमित देतात. परप्रांतातून महाराष्ट्र कॅडरमध्ये आलेले अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकारी महाराष्ट्रातील अनेक गुन्हेगारी प्रभावित जिल्ह्यांमध्ये काम करण्यास इच्छुक नसतात. त्यांच्यासाठी लांडे यांच्यासारखे अधिकारी आदर्श ठरावे.

                    मराठह्यांड तफ़्रे लांडे पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा