शुक्रवार, ५ एप्रिल, २०१३

मराठमोळ्या राहीचा वर्ल्डकपमध्ये ‘सुवर्ण’भेद

महाराष्ट्रातील मराठमोळी सुकन्या राही सरनोबत हिनं कोरियामध्ये सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २५ मीटर पिस्तुल प्रकारात राहीनं हा पराक्रम रचला आणि भारताचा तिरंगा डौलानं फडकवला.

नेमबाजी वर्ल्ड कपमधील २५ मीटर पिस्तुल प्रकाराच्या अंतिम फेरीत कोरियाच्या किम क्याँगेचं कडवं आव्हान राही सरनोबतपुढे होतं. परंतु, जराही न डगमगता, अत्यंत संयमानं, शांत डोक्यानं राहीनं आपली पिस्तुल 'चालवली' आणि ८-६ अशी बाजी मारली. आजवर एकाही भारतीय नेमबाजाला जी किमया साधता आली नव्हती, ज्या सुवर्णपदकाचं स्वप्न अनेकांनी पाहिलं होतं, ते कोल्हापूरच्या पोरीनं प्रत्यक्षात साकारलं. २३ वर्षीय राहीसाठी आजचा दिवस खरोखरच 'सोनियाचा दिनु' ठरला.

२०११मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड कप स्पर्धेत राहीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. त्या कामगिरीच्या जोरावर तिला लंडन ऑलिंपिकचं तिकीट मिळालं खरं, पण तरीही सुवर्णपदक हुकल्याची खंत तिच्या मनात कुठेतरी होतीच. दोन वर्षांपूर्वी झालेली चूक यावेळी करायची नाही, हे पक्कं ठरवूनच राही यंदा कोरियाला गेली आणि जिगरबाज खेळ करत तिनं 'सुवर्णलक्ष्य' भेदलं.

स्वप्न साकार झालं!
वर्ल्ड कपचं सुवर्णपदक जिंकायचं माझं स्वप्न आज साकार झालंय. हा आनंद केवळ अवर्णनीय आहे, अशी भावना राहीनं विजयानंतर व्यक्त केली. माझे प्रशिक्षक अनाटोली पुद्दुबनी यांच्यासह मी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती, त्याचं चीज झालं आहे. 'लक्ष्य' आणि 'व्हस्कॉन' यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ही कामगिरी शक्य झाली, असंही तिनं आवर्जून नमूद केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा