परदेशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना भारतीय पदार्थ मिळण्याची नेहमीच वानवा असते आणि झटकेपट पोट भरणारा गरमागरम वडा पाव म्हंटलं की, त्यांना मुंबईची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पण अशा खवय्यांसाठी एक खास खबर... याच वडा पावची चव आता अगदी सातसमुद्रापार साहेबांच्या देशात, लंडनमध्येही चाखता येणार आहे आणि तेही आपल्या खास मराठमोळ्या हॉटेलमध्ये.
'श्रीकृष्ण वडा पाव' या नावानेच लंडनमध्ये हॉटेल सुरू करण्यात आलं आहे आणि तेही एका मराठी माणसाने हे हॉटेल सुरू केल्याने त्याला खास 'मराठी तडका' असणार हे मात्र निश्चित. सुबोध जोशी आणि सुजय सोहनी यांनी १५ ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे हॉटेल सुरू केलं. २०१० मध्ये एक छोटसं स्नॅक्स बार त्यांनी सुरु केलं होतं. पण अल्पावधीतच भारतीय खवय्यांनी या स्नॅक्स बारला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. भारतीयांचा मिळालेल्या ह्या पाठिंब्याचा जोरावर त्यांनी रेस्टॉरंट देखील उभारलं आणि आता तर लंडनमधील हॅरो शहरातही दुसरं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 'मराठीमोळी टीम' असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये तुम्हांला अस्सल मराठी पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे आणि त्यात सगळ्यात खास पदार्थ म्हणजे वडा पाव. या रेस्टॉरंटमध्ये फक्त एक युरो मध्ये तुम्हांला वडा पावचा आस्वाद घेता येईल. पण फक्त वडा पावच नव्हे तर बटर वडा पाव, शेजवान वडा पाव अशा वेगवेगळ्या चवीतही वडा पाव उपलब्ध आहे. वडा पावसोबतच अनेक भारतीय पदार्थ येथे तुम्हांला मिळू शकतात. मेनू कार्डवर नजर टाकल्यास तुम्हाला दिसूनही येईल की, परदेशी पदार्थांना येथे कुठेही स्थान देण्यात आलेलं नाही.
पुरणपोळी सारख्या अस्सल मराठी पदार्थासोबतच इतर भारतीय पदार्थही तुम्हांला मिळणार आहे. म्हणजे पंजाबी, साऊथ इंडियन, गुजराती अशा पदार्थांची अक्षरश: रेलचेल आहे. खास चाट म्हणजे झणझणीत तिखट अशी पाणीपुरी देखील मिळेल. या रेस्टोरंटमुळे लंडनमधील खवय्यांची भारतीय पदार्थ चाखण्याची गैरसोय दूर झाली आहेच पण परदेशी खवय्येही ही या रेस्टॉरंटकडे वळतील असा विश्वास अनिवासी भारतीयांना बोलून दाखवला आहे.