सोमवार, ११ नोव्हेंबर, २०१३

सुप्रीम कोर्टात मराठी बाणा

वकिलीत कार्यरत असलेल्या कुणालाही दिल्लीत जाऊन सुप्रीम कोर्ट पाहण्याची नेहमीच आस असते. मराठवाड्यातील वसमत तालुक्यात घडलेले अॅड. शिवाजी जाधव यांनी सुप्रीम कोर्टाच्या पायरीवर मराठी वकिली बाण्याचा दमदार आवाज पोहोचविला. सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले ते पहिलेच मराठी वकील...

मराठवाड्यातील वसमत तालुक्यातील शिवाजी जाधव यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात उच्च शिक्षण घेतले. दिल्लीत सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली. वकिलीत चांगला जम बसला. ३० ज्युनिअर्सची टीम सोबत घेऊन काम करणारे जाधव यांची सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे पद मिळविणारे ते पहिले मराठी वकील आहेत. वसमतपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शिवाजी जाधव वसमत तालुक्यातील किन्होळा गावाचे रहिवासी. त्यांचे वडील मुंजाजीराव जाधव हे गावातील पहिले पदवीधर. त्यांनी वकील होण्याचा निर्णय घेतला. कुटुंबासाठी शिक्षक, विकास अधिकारी या पदांवर नोकरी करीत त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एलएलबी झाल्यावर नोकरी सोडून वकिली सुरू केली. पुढे ते १९८४ ते १९८९ या कालावधीत आमदारही होते. शिवाजी जाधव यांनी १९८५मध्ये एलएलबी पदवी पुणे विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने मिळवली. त्यानंतर मुंबई विद्यापीठात एलएलएम पूर्ण केले. मुंबईत ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. एम. तारकुंडे यांचे सहकारी चित्तरंजन दळवी यांनी त्यांना प्रेरणा दिली. पुढे अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठात त्यांनी कायद्यातील उच्च शिक्षण घेतले. शिक्षणानंतर तेथे एक वर्ष नोकरी केली, पण वडिलांच्या आग्रहामुळे ते भारतात परतले. अमेरिकेतून परतल्यावर औरंगाबादेत हायकोर्टात वकिली सुरू केली. मित्रांबरोबर चर्चेतून सुप्रीम कोर्टात वकिली करण्याचा निर्णय झाला आणि अॅड. जाधव जून १९८९मध्ये दिल्लीत दाखल झाले.सुप्रीम कोर्टात त्यांनी प्रॅक्टिसमध्ये जम बसविला. नॉएडा येथे मोठे कार्यालय सुरू केले. आता ३० ज्युनिअर वकील त्यांच्यासोबत काम करतात. गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील अशी त्यांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक महापालिका, जिल्हे, तालुके, साखर कारखाने, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, राजकीय नेते, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनी शिंगणापूर, शेगाव संस्थाने आदींची प्रकरणे त्यांनी सुप्रीम कोर्टात हाताळली आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाच्या खटल्यातही त्यांचा सहभाग आहे. पुणे जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या वारसांना ३५ हजार हेक्टर अतिरिक्त जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. हा खटलाही जाधव यांनीच चालविला. मालेगाव, सिन्नर तालुक्यांतील एमआयडीसीने संपादित केलेली गावे त्यांनी सोडवून आणली. शिक्षण सेवक, विक्रीकर निरीक्षक, वक्फ बोर्ड, विनय कोरे यांच्या साखर कारखान्याचे प्रकरण आदी प्रकरणे त्यांनी यशस्वीपणे हाताळली.सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड झाली. या पदावर काम करणारे ते पहिले मराठी. रोज नवी प्रकरणे, नवी आव्हाने पेलणारे जाधव करिअरबाबत अत्यंत सकारात्मक आहेत. 'आयुष्यात वेळेचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. गेलेला क्षण परत येणार नाही. तो सत्कारणी कसा लागतो, यावर तुमचे भवितव्य अवलंबून असते. कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत काम करीत राहिल्यास अपयश येणार नाही,' असे त्यांचे सरळ-सोपे तत्त्वज्ञान आहे.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

मोहिमेत मराठी तंत्रज्ञ


         पीएसएलव्ही सी - २५ या उपग्रह प्रक्षेपकाने मंगळाकडे यशस्वी झेप घेतली. या उपग्रहाच्या निर्मितीत प्रदीप देवकुळे मराठी अभियंत्यांने अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. उपग्रहाच्या संदेशवहनासाठीची जबाबदारी सांभाळल्याचा मनस्वी आनंद झाल्याचे प्रदीप देवकुळे यांनी मटा शी बोलताना सांगितले. 

        औरंगाबादेतील गर्व्हर्मेंट पॉलिटेक्निकमधून मॅकेनिकलची पदविका घेतलेले देवकुळे मूळचे भिंगार (जि. नगर) येथील आहेत. मॅकेनिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी ग्राइंड मास्टरमध्ये तीन वर्षे नोकरी केली. २००८मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्त्रो) रुजू झाले. भारताने आज पहिली मंगळ मोहीम राबविली. टेलिमॅट्रिक ट्रॅकिंग कंपाउंड (टीटीसी) अँटेना, पॅराबोलिक रिफ्लेक्टर सिस्टम यासह त्यांनी कम्युनिकेशन सिस्टम ग्रुपमध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

        देवकु
ळे म्हणाले, इस्त्रोचे चेअरमन के. राधाकृष्णन यांचे हे स्वप्न होते. कारण आपण, चंद्रयान एक मोहीम यशस्वी केली. चंद्रयान - २ ची तयारी करण्यात आली आहे, पण मंगळ मोहिमेसाठी राधाकृष्णन यांनी स्वप्न पाहिले होते. अमेरिका, रशिया, युरोपीय देशांनंतर ही कामगिरी करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. ऑगस्ट २०१२मध्ये या प्रकल्पाला मान्यता मिळाली. वर्षभराहून कमी कालावधी उरलेला असताना आमच्या सर्वांवर मोठी जबाबदारी होती. माझ्याकडे उपग्रहाकडून आमच्याकडे येणारे संदेश, आमच्याकडून दिले जाणारे संदेश वहन करण्यासाठी लागणारे अँटेना, रिफ्लेक्टर याच्या निर्मितीत मी होतो. माझी पत्नी नंदिनी हिचे मला मोलाचे सहकार्य या मोहिमेदरम्यान लाभले. '' 

       कंम्प्युटरवर केलेले डिझाइन आणि थेरॉटिकल डिझाइन तपासून ते जुळविण्याचे अवघड काम देवकुळे यांच्याकडे होते. अँटेना आणि रिफ्लेक्टरसाठीचे अॅल्युमिनिअम प्रोटोटाइप त्यांनी बनविले. त्याची यशस्वी चाचणी मुंबईला गोदरेज कंपनीत करण्यात आली, असेही देवकुळे यांनी आवर्जून सांगितले. 
प्रदीप माझ्याकडे डिप्लोमाला होता. तो मुळातच अतिशय हुशार, सदैव नवीन कल्पना, नावीन्यतेत रुळणारा हा विद्यार्थी होता. एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याची त्याची वृत्ती होते. मंगळ मोहिमेत त्याचा सहभाग आहे, याचा मनस्वी आनंद झाला.