बुधवार, २९ एप्रिल, २०१५
कतारमध्ये मराठमोळा फॅमिली स्पोर्ट्स डे
कतार येथील महाराष्ट्र मंडळातर्फे दोहा येथील अल जझिरा अकादमीच्या मैदानात नुकताच 'फॅमिली स्पोर्ट्स डे' साजरा झाला. यात आऊट डोअर आणि इन डोअर खेळ घेण्यात आले. सर्व वयोगटांतील स्पर्धकांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यात त्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. पाच वर्षांखालील मुलांसाठी चमचा गोटी, तसेच खुल्या आणि विशेष वयोगटांतील स्पर्धकांसाठी कॅरम, बुद्धीबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धावणे, उंच उडी, खो-खो, कबड्डी आणि बॉक्स क्रिकेट आदी स्पर्धा घेण्यात आल्या.
नाशिकच्या प्रसादची सतार लंडनमध्ये गुंजणार
नाशिककर असलेल्या प्रसिध्द सतारवादक प्रसाद रहाणे याला लंडनच्या पॅलेडियम थिएटरमध्ये सतार वाजवण्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून, १ मे ते २८ जून या कालावधीत तो आपली कला तेथे सादर करणार आहे. भारतातल्या काही मोजक्याच वादकांना अशी संधी यापूर्वी मिळाली आहे. लंडनच्या या थिएटरमध्ये सतार वाजवणारा महाराष्ट्रातला तो पहिलाच सतार वादक असेल.
लंडन येथील वेस्टिन येथे पॅलेडियम नावाचे थिएटर आहे. तेथे १ मे ते २८ जून या कालावधीत 'बियॉण्ड बॉलिवूड' हा भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भारताच्या विविध राज्यातील संस्कृतींचा नृत्य, नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून परिचय करून देण्यात येणार आहे. या थिएटरमध्ये हा कार्यक्रम सुमारे दीड महिना चालणार असून, ५६ पेक्षा अधिक प्रयोग सादर होणार आहेत. यात शास्त्रीय व उपशास्त्रीय वादनाबरोबरच नाटकांनाही प्रसाद लाईव्ह संगीत देणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिध्द संगीतकार सलिम सुलेमान यांचे संगीत लाभले आहे.
रविवार, १९ एप्रिल, २०१५
अमेरिकेतील ज्येष्ठ मराठी बांधवांची जुलैमध्ये परिषद
आयुष्यातील सेकंड इनिंगही धडाकेबाज षटकार व चौकार मारून साजरी करावी, या हेतूने चर्चा व विचार-विनीमय करण्यासाठी अमेरिकेतील तमाम मराठमोळी ज्येष्ठ मंडळी २ जुलै २०१५ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने लॉस एन्जिलीसमध्ये एकत्र येत आहेत. मातृभूमीपासून वर्षानुवर्षे दूर राहिलेले आणि स्थलांतरानंतर सांस्कृतिक व कौटुंबीक समस्यांचा यशस्वी सामना करणारे विविध क्षेत्रातील निवृत्त मराठी नागरिक या परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. अॅनहॅम येथील कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही परिषद होत असून त्याचे उदघाटन अभिनेते डॉ. मोहन आगाशे करणार आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाने ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे कामकाज तीन सत्रात चालणार आहे. संयोजक डॉ. अशोक सप्रे व बीएमएम माध्यम समितीचे सदस्य वैभव पुराणिक यांनी ही माहिती दिली.
'उत्तररंग' ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे. डॉ. दिलीप जेस्ते, डॉ. शरयू तुळपुळे व शशांक परांजपे या परिषदेत ज्येष्ठांच्या समस्यांचे विविध पैलू मांडणार आहेत. उत्तररंग सुखकर होण्यासाठी काही उपायही ते सांगणार आहेत. अशी माहिती वैभव पुराणिक यांनी दिली. ज्येष्ठांचे भवितव्य, एकाकी राहाणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्न, निवृत्तांसाठी उत्तर अमेरिकेतील शांतीवनसारखे प्रकल्प इत्यादी विषय परिषदेत चर्चिले जातील, असेही पुराणिक यांनी नमूद केले.
'
अमेरिकन लष्करातील मराठी कर्नल
शालेय जीवनापासूनच त्यांना लष्करी शिस्त आणि लष्करी गणवेशाचे आकर्षण होतं. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणानंतर लष्करात दाखल होण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली. बौद्धिक परीक्षेत तर ते उत्तीर्ण झाले पण लहानपणी पायाला झालेल्या छोट्याशा दुखण्यानं त्यांना मेडिकल टेस्टमध्ये फेल केलं आणि भारतीय लष्करात जाण्याची त्यांची संधी हुकली. पण इच्छा आणि जिद्द असली की कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याची प्रचीती त्यांना पुढे आली आणि भारतीय लष्करात नाकारला गेलेला हा तरुण पुढे अमेरिकन लष्करात कर्नल झाला. नारायण जयराम देशमुख असं या अमेरिकन लष्करातील मराठी कर्नलचं नाव. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हे कर्नल देशमुख यांचं मूळ गाव. जवळच्याच आसिफाबाद येथे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांचा जन्म आसिफाबादला झाला आणि शिक्षण झालं हैदराबादला. कारण जवळचं शहराचं ठिकाण हैदराबादच होतं. मधल्या काळात नागपुरात लाकडी पुलाजवळील एका शाळेत ते शिकले पण काही महिनेच. हैदराबादला एमबीबीएसला असताना ते एनसीसीत अंडर ऑफिसर होते व सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. एकदा सैन्य भरतीची जाहिरात पाहून डेहराडूनला ते राष्ट्रीय मिल्ट्री अकादमीत गेले. तेथे लेखी परीक्षेनंतरच्या मुलाखतीत 'तू काय करतो', असं त्यांना विचारलं असता आपण एमबीबीएस प्रथम वर्षाला असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यावर तेथील अधिकाऱ्याने त्यांना 'आधी एमबीबीएस पूर्ण कर', असा सल्ला दिला.
नागपुरातील १५ ऑगस्ट
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देश स्वतंत्र झाला त्यावेळी नारायणराव नागपुरात शिकत होते. त्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले की, सर्वत्र रोशणाई करण्यात आली होती. फटाके फुटत होते. आमच्या वडिलांनी कुठून तरी कार आणून आम्हाला शहरात फेरफटका मारला. रात्री १२ वाजता आम्ही सीताबर्डी किल्ल्यासमोर उभे होतो. १२ वाजताच युनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा फडकला, हा क्षण आजही हृदयात जिवंत असल्याचे ते सांगतात.
गुरुवार, ९ एप्रिल, २०१५
अमेरिकेत मराठी रुजावे म्हणून...
अमेरिकेत सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणत: शाळांची सत्रे सुरु होतात. सप्टेंबरमध्ये उन्हाळा संपून फॉल किंवा पानगळीचा मोसम सुरु होतो. सप्टेंबरमध्ये इतर शाळांबरोबर इथे मराठी शाळांचीही सत्रे सुरु होतात. बृहन्महाराष्ट्र मंडळाने मराठी पुढच्या पिढीपर्यंत पोचावी या हेतूने सुरु केलेल्या या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे.
येथील बहुतेक मुलांना पालक मराठी असले आणि ते घरात मराठी बोलत असले तर मराठी समजतं. पण ही मुलं शाळेत जायला लागल्यावर मात्र मराठी बोलणं जवळजवळ सोडून देतात. मग घरोघरी आई वडील मराठीत प्रश्न विचारत आहेत आणि मुले इंग्रजीत उत्तर देत आहेत असे दृष्य पहायला मिळते. मराठी वाचायचे तर दूरच राहो. त्यामुळे ज्या मराठी भाषेने आपलं पालन पोषण केलं ती भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही हे येथील मराठी लोकांच्या लक्षात आलं.
त्या दृष्टीने पावले उचलावीत म्हणून उत्तर अमेरिकेच्या अनेक शहरात - विशेषत: मोठ्या शहरात एकत्र जमून आपल्या मुलांना मराठी शिकवायचे प्रयत्न सुरु झाले. कॅनडाच्या टोरांटोमध्ये अशीच एक मराठी शाळा १९७६ मध्ये शरद कावळे यांच्या पुढाकाराने सुरु झाली. ही शाळा आजतागायत चालू आहे. अमेरिकेच्याही काही शहरात अशा शाळा सुरु झाल्या पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. घरगुती स्वरुपात अधून मधून शाळा सुरु होत होत्या व बंदही पडत होत्या. पण वेगवेगळ्या शहरात सुरु असलेल्या ह्या प्रयत्नात ताळमेळ नव्हता.
प्रत्येक जण आपआपल्या कुवतीप्रमाणे मराठीचं शिकवायचा प्रयत्न करत होता. २००७ च्या आसपास बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या हे लक्षात आले. त्यांनी या सर्व शाळांना एका धाग्याने बांधायचं ठरवलं. त्यांनी नेमलेल्या समितीवरील सुनंदा टुमणे आणि विजया बापट यांनी मेहनत करून या शाळांसाठी उत्तर अमेरिकन संदर्भ असलेला अभ्यासक्रम बनवला.
महाराष्ट्रातील मराठी मुलांना तिने अमेरिकेची माहिती दिली व अमेरिकेविषयी त्यांचे गैरसमज दूर केले. आपल्या या चर्चा तिने व्हिडीओबद्ध केल्या असून ते व्हिडीओ ती आपल्या अमेरिकेतल्या शाळेत दाखवणार आहे. मराठी शाळेच्या मुळे तिची तिच्या मुळांशी नाळ पुन्हा जोडली गेली आहे. मराठी शाळेच्या यशाची यापेक्षा मोठी पावती ती काय असणार?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)