रविवार, १९ एप्रिल, २०१५
अमेरिकेतील ज्येष्ठ मराठी बांधवांची जुलैमध्ये परिषद
आयुष्यातील सेकंड इनिंगही धडाकेबाज षटकार व चौकार मारून साजरी करावी, या हेतूने चर्चा व विचार-विनीमय करण्यासाठी अमेरिकेतील तमाम मराठमोळी ज्येष्ठ मंडळी २ जुलै २०१५ रोजी एका परिषदेच्या निमित्ताने लॉस एन्जिलीसमध्ये एकत्र येत आहेत. मातृभूमीपासून वर्षानुवर्षे दूर राहिलेले आणि स्थलांतरानंतर सांस्कृतिक व कौटुंबीक समस्यांचा यशस्वी सामना करणारे विविध क्षेत्रातील निवृत्त मराठी नागरिक या परिषदेला उपस्थित राहाणार आहेत. अॅनहॅम येथील कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही परिषद होत असून त्याचे उदघाटन अभिनेते डॉ. मोहन आगाशे करणार आहेत. बृहन्महाराष्ट्र मंडळाने ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे कामकाज तीन सत्रात चालणार आहे. संयोजक डॉ. अशोक सप्रे व बीएमएम माध्यम समितीचे सदस्य वैभव पुराणिक यांनी ही माहिती दिली.
'उत्तररंग' ही या परिषदेची मूळ संकल्पना आहे. डॉ. दिलीप जेस्ते, डॉ. शरयू तुळपुळे व शशांक परांजपे या परिषदेत ज्येष्ठांच्या समस्यांचे विविध पैलू मांडणार आहेत. उत्तररंग सुखकर होण्यासाठी काही उपायही ते सांगणार आहेत. अशी माहिती वैभव पुराणिक यांनी दिली. ज्येष्ठांचे भवितव्य, एकाकी राहाणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्न, निवृत्तांसाठी उत्तर अमेरिकेतील शांतीवनसारखे प्रकल्प इत्यादी विषय परिषदेत चर्चिले जातील, असेही पुराणिक यांनी नमूद केले.
'
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा