रविवार, १९ एप्रिल, २०१५
अमेरिकन लष्करातील मराठी कर्नल
शालेय जीवनापासूनच त्यांना लष्करी शिस्त आणि लष्करी गणवेशाचे आकर्षण होतं. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणानंतर लष्करात दाखल होण्यासाठी त्यांनी परीक्षा दिली. बौद्धिक परीक्षेत तर ते उत्तीर्ण झाले पण लहानपणी पायाला झालेल्या छोट्याशा दुखण्यानं त्यांना मेडिकल टेस्टमध्ये फेल केलं आणि भारतीय लष्करात जाण्याची त्यांची संधी हुकली. पण इच्छा आणि जिद्द असली की कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याची प्रचीती त्यांना पुढे आली आणि भारतीय लष्करात नाकारला गेलेला हा तरुण पुढे अमेरिकन लष्करात कर्नल झाला. नारायण जयराम देशमुख असं या अमेरिकन लष्करातील मराठी कर्नलचं नाव. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हे कर्नल देशमुख यांचं मूळ गाव. जवळच्याच आसिफाबाद येथे वडील सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांचा जन्म आसिफाबादला झाला आणि शिक्षण झालं हैदराबादला. कारण जवळचं शहराचं ठिकाण हैदराबादच होतं. मधल्या काळात नागपुरात लाकडी पुलाजवळील एका शाळेत ते शिकले पण काही महिनेच. हैदराबादला एमबीबीएसला असताना ते एनसीसीत अंडर ऑफिसर होते व सर्वोत्कृष्ट कॅडेटचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. एकदा सैन्य भरतीची जाहिरात पाहून डेहराडूनला ते राष्ट्रीय मिल्ट्री अकादमीत गेले. तेथे लेखी परीक्षेनंतरच्या मुलाखतीत 'तू काय करतो', असं त्यांना विचारलं असता आपण एमबीबीएस प्रथम वर्षाला असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यावर तेथील अधिकाऱ्याने त्यांना 'आधी एमबीबीएस पूर्ण कर', असा सल्ला दिला.
नागपुरातील १५ ऑगस्ट
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी देश स्वतंत्र झाला त्यावेळी नारायणराव नागपुरात शिकत होते. त्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले की, सर्वत्र रोशणाई करण्यात आली होती. फटाके फुटत होते. आमच्या वडिलांनी कुठून तरी कार आणून आम्हाला शहरात फेरफटका मारला. रात्री १२ वाजता आम्ही सीताबर्डी किल्ल्यासमोर उभे होतो. १२ वाजताच युनियन जॅक खाली उतरला आणि तिरंगा फडकला, हा क्षण आजही हृदयात जिवंत असल्याचे ते सांगतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा