शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४
अमेरिकेत मराठी रुजावे म्हणून.
अमेरिकेत सप्टेंबरमध्ये सर्वसाधारणत: शाळांची सत्रे सुरु होतात. सप्टेंबरमध्ये उन्हाळा संपून फॉल किंवा पानगळीचा मोसम सुरु होतो. सप्टेंबरमध्ये इतर शाळांबरोबर इथे मराठी शाळांचीही सत्रे सुरु होतात. बृहन्महाराष्ट्र मंडळाने मराठी पुढच्या पिढीपर्यंत पोचावी या हेतूने सुरु केलेल्या या रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे.
येथील बहुतेक मुलांना पालक मराठी असले आणि ते घरात मराठी बोलत असले तर मराठी समजतं. पण ही मुलं शाळेत जायला लागल्यावर मात्र मराठी बोलणं जवळजवळ सोडून देतात. मग घरोघरी आई वडील मराठीत प्रश्न विचारत आहेत आणि मुले इंग्रजीत उत्तर देत आहेत असे दृष्य पहायला मिळते. मराठी वाचायचे तर दूरच राहो. त्यामुळे ज्या मराठी भाषेने आपलं पालन पोषण केलं ती भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचत नाही हे येथील मराठी लोकांच्या लक्षात आलं.
त्या दृष्टीने पावले उचलावीत म्हणून उत्तर अमेरिकेच्या अनेक शहरात - विशेषत: मोठ्या शहरात एकत्र जमून आपल्या मुलांना मराठी शिकवायचे प्रयत्न सुरु झाले. कॅनडाच्या टोरांटोमध्ये अशीच एक मराठी शाळा १९७६ मध्ये शरद कावळे यांच्या पुढाकाराने सुरु झाली. ही शाळा आजतागायत चालू आहे. अमेरिकेच्याही काही शहरात अशा शाळा सुरु झाल्या पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. घरगुती स्वरुपात अधून मधून शाळा सुरु होत होत्या व बंदही पडत होत्या. पण वेगवेगळ्या शहरात सुरु असलेल्या ह्या प्रयत्नात ताळमेळ नव्हता.
प्रत्येक जण आपआपल्या कुवतीप्रमाणे मराठीचं शिकवायचा प्रयत्न करत होता. २००७ च्या आसपास बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या हे लक्षात आले. त्यांनी या सर्व शाळांना एका धाग्याने बांधायचं ठरवलं. त्यांनी नेमलेल्या समितीवरील सुनंदा टुमणे आणि विजया बापट यांनी मेहनत करून या शाळांसाठी उत्तर अमेरिकन संदर्भ असलेला अभ्यासक्रम बनवला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा