शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४
सौदी अरेबियात मराठी वृत्तपत्र
सौदी अरेबियात मराठीचा फारसा संबंध येत नाही. मात्र, तेथे गेलेल्या मराठी लोकांना मराठीतून काहीतरी साहित्य उपलब्ध व्हावे, असे वाटत होते. यासाठी चौघांनी एकत्र येत 'वृत्तवेध' नियतकालिक सुरू केले. त्याचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यांच्या या उपक्रमामुळे सौदी अरेबियात मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सौदी अरेबियात नोकरीनिमित्त गेलेल्या प्रवीण मानकर, विजयसिंह शिंदे, विनायक गुमास्ते आणि शकील शेख यांनी या नियतकालिकाची सुरुवात केली आहे. मराठी टोस्ट मास्टर्स मंडळ, खोबर-दम्माम यांच्या माध्यमातून हे नियतकालिक प्रकाशित करण्यात आले आहे.
सौदी अरेबियात गेल्यावर याठिकाणी असे काही मराठी साहित्य प्रकाशित करता येईल, असे अजिबात वाटले नव्हते. मात्र, मराठी साहित्याची गरज वाटू लागल्याने एक नियतकालिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मराठी टोस्ट मास्टर्स मंडळ खोबर दम्माम चे सहकार्य लाभले. मराठी भाषेचा हा जगातील पहिला टोस्ट मास्टर्स क्लब आहे.
मराठी टोस्टमास्टर्स मंडळाच्या माध्यमातून सौदी अरेबियातील खोबर आणि दम्माम ह्या शहरातील मराठी भाषिक एकत्र आले. त्यामुळे साहित्याचे आदान-प्रदान करणे शक्य झाले. त्यासाठीच 'वृत्तवेध'ची निर्मिती झाल्याचे क्लबचे अध्यक्ष विनायक गुमास्ते यांनी सांगितले.
वृत्तवेधच्या प्रकाशनासाठी रामेश्वर कोहाकडे, पराग पाटील आणि मिलिंद पटवर्धन यांची मदत झाली. अपेक्षा नसतानाही एक मराठी नियतकालिक सौदी अरेबियात प्रकाशित झाले याचा आनंद वेगळाच आहे, अशा भावना मराठी लोकांनी व्यक्त केल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा