शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४
मराठी मातीतील चित्रकलेचा जागतिक स्तरावर गौरव
मराठी मातीतील चित्रकलेचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. पुणेकर चित्रकार विलास कुलकर्णी यांना फ्रान्समधील 'रॉचमेअर बिनाले' या प्रतिष्ठेच्या महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. कुलकर्णी यांची फेसबुकवरील चित्रे पाहून महोत्सवाच्या संयोजकांनी महोत्सवात चित्रप्रदर्शनासह कार्यशाळा घेण्यासाठी बोलाविले असून, या महोत्सवाला उपस्थित राहणारे ते एकमेव भारतीय चित्रकार आहेत.
कुलकर्णी यांचा चित्रकार होण्याचा प्रवासही थक्क करणारा आहे. शाळेत असताना चित्र काढल्यानंतर कुलकर्णी यांची चित्रकला बाजूला पडली. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा केल्या. बीकॉम झाल्यानंतर डीटीएल आणि दोन वर्षे कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी तीन वर्षे नोकरी केली. नोकरी सोडून १९ वर्षे प्रकाशन व्यवसाय केला. ज्येष्ठ चित्रकार मिलिंद मुळीक यांचे चित्रकलेसंदर्भातील पुस्तक वाचनात आल्यानंतर झपाटून गेलेल्या कुलकर्णी यांनी प्रकाशनाचा चांगला चाललेला व्यवसाय सोडून वयाच्या ४२व्या वर्षी पूर्णवेळ चित्रकला करण्याचा निर्णय घेतला. मुळीक यांच्याकडे चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. आता ते चित्रकलेचे क्लासेस घेतात.
फ्रान्समधील रॉचमेअर या शहरात हा चित्रकलेचा बिनाले आयोजित केला जातो. यंदा बिनालेचे पाचवे वर्ष असून, ५ ते १५ जुलै या कालावधीत होणार आहे. जगभरातील आठ देशांतील १८ चित्रकार बिनालेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात भारतातून केवळ कुलकर्णी यांनाच निमंत्रण आले आहे. बिनालेमध्ये कुलकर्णी यांच्या दोन कार्यशाळा होणार आहेत. तसेच त्यांचे दहा दिवसांचे चित्रप्रदर्शनही आहे. कार्यशाळेमध्ये फ्रान्समधील चित्रप्रेमींना आपल्या मातीतील चित्रकला, विलक्षण रंगसंगतीचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा