रविवार, १७ मार्च, २०१३

मराठी माणसांचा ' आनंदसोहळा

अमेरिकेतल्या मराठी माणसांचा ' आनंदसोहळा ' म्हणून ओळखल्या जाणारे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन यंदा ५ ते ७ जुलै २०१३ दरम्यान प्रोव्हिडन्स येथे होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सध्या जोरात सुरू असून , सुप्रसिद्ध विज्ञान लेखक बाळ फोंडके , सिनेदिग्दर्शक आशुतोष गोवारीकर , अभिनेते प्रशांत दामले , क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आदी मान्यवार ही मैफल सजवणार आहेत.
सुप्रसिध्द सिने-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे असतील. प्रसिध्द विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
मराठी रंगभूमीवरचा ' विक्रमवीर ' प्रशांत दामले यावेळी जरा वेगळ्या रुपात रंगमंचावर अवतरणार आहे. या गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे , ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर येणार आहे. त्याचबरोबर , भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हेही मुलाखतीद्वारे रसिकांना सामोरे जाणार असून , सुप्रसिध्द स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी त्यांची मुलाखत घेतील.
बी.एम.एम.च्या अधिवेशनात कोणतं नाटक येतं , याकडे अमेरिकेतील नाटकप्रेमी नजर लावून असतात. यावेळी सुकन्या कुलकर्णी , अजित भुरे , अद्वैत दादरकर आदींच्या भूमिका असलेलं , ' एकदंत क्रिएशन्स ' निर्मित आणि विजत केंकरे दिग्दर्शित ' फॅमिली ड्रामा ' रसिकांच्या भेटीला येत आहे.
त्याबरोबर , यावर्षी रसिकांना संगीत-नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेलं ' संगीत मानापमान ' यावेळी सादर होणार आहे. तसेच या अधिवेशनात कवी सौमित्र आणि वैभव जोशी यांची काव्यमैफलही होईल.
बी.एम.एम. सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रिया बापट करणार असून , प्रशांत दामले हेही या सोहळ्यात ' विशेष अतिथी ' म्हणून सहभागी होतील.
या अधिवेशनाविषयी अधिक माहितीसाठी क्लिक करा
www.bmm2013.org
www.facebook.com/bmm2013

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा